Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे शहरात बालस्नेही विकासाचा नवा दृष्टिकोन; लहान मुलांच्या गरजांना शहरी नियोजनात प्राधान्य!

पुणे शहरात बालस्नेही विकासाचा नवा दृष्टिकोन; लहान मुलांच्या गरजांना शहरी नियोजनात प्राधान्य!

पुणे : शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते, उड्डाणपूल आणि मोठ्या इमारती उभारणे नव्हे, तर त्या शहरात वाढणाऱ्या लहान मुलांना सुरक्षित वातावरण आणि पालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

हाच दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवत पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अर्बन ९५’ आणि ‘नर्चरिंग नेबरहूड २.०’ कार्यशाळेत बालस्नेही शहरी विकास आणि पालकांच्या कल्याणासाठी विविध क्षेत्रांतील घटकांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात आला.

या कार्यशाळेत १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.शहरातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि शहरी नियोजन करताना लहान बालकांच्या गरजा तसेच पालकांचे कल्याण यांना प्राधान्य कसे देता येईल, यावर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. पुणे शहरात यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध बालस्नेही उपक्रमांचा आढावा घेत भविष्यात त्यांचा विस्तार करण्याच्या दृष्टीनेही विचारमंथन झाले.

पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांनी ‘अर्बन ९५’ आणि ‘नर्चरिंग नेबरहूड २.०’ अंतर्गत पुणे शहराने केलेल्या प्रगतीची माहिती दिली. शहरातील या उपक्रमांची दखल घेऊन त्यांचे सादरीकरण नुकतेच महाराष्ट्र राज्य समितीसमोर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

केवळ प्रायोगिक उपक्रम राबविणे किंवा अर्थसंकल्पात तरतूद करणे पुरेसे नसून, बालस्नेही दृष्टिकोनाचा संपूर्ण शहरी नियोजनात समावेश होणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. विविध विभागांमध्ये समन्वय साधून हे उपक्रम दीर्घकाळ टिकतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेच्या उपआयुक्त श्रीमती किशोरी शिंदे यांनी पुणे शहरात ‘अर्बन ९५’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. बालविकासकेंद्रित दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यापासून ते त्याला शाश्वत स्वरूप देण्यापर्यंतच्या प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला.

जनजागृतीपासून नागरिकांच्या सहभागापर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा बालस्नेही उपक्रमांचा अधिकाधिक भागांमध्ये विस्तार करणे, जनजागृती मोहिमा राबविणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे, या मुद्द्यांवर कार्यशाळेत चर्चा झाली. यासोबतच बालविकासाला प्रोत्साहन देणारे ‘संगोपन कट्टा’ आणि समुदायस्तरीय मेळावे यांसारखे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींनी आपापले अनुभव मांडत सामाजिक आणि वर्तनात्मक बदल घडविण्यासाठी संवाद, समन्वय आणि लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments