
पौड( प्रतिनिधी)
मुळशी:- दिवाळीच्या सणाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने अखिल वारकरी सेवा संघाच्या वतीने पौड येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेनापती बापट सभागृह, पंचायत समिती मुळशी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील १०० दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ व जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुळशीतील कर्तृत्ववान नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर समाजातील दिव्यांग बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, या हेतूने संघाच्या वतीने तालुक्यातील १०० दिव्यांग व्यक्तींना दिवाळी फराळ, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून दिव्यांग बांधवांना सणाच्या काळात आधार देण्याचा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमात मुळशी तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान मुलींचा ‘नवदुर्गा’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि त्यांच्या कार्याला समाजासमोर आणण्याचा हा उपक्रम ठरला.
अखिल वारकरी सेवा संघाच्या या सामाजिक उपक्रमातून दिवाळीच्या सणाला सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जोड मिळाली. गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासोबतच कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून समाजापुढे सकारात्मक संदेश देण्यात आला.





