
पौड प्रतिनिधी
मुळशी:- पिरंगुट येथील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड तसेच रोडरोमिओंकडून होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या वतीने बावधन पोलीस ठाण्यात निवेदन देऊन शैक्षणिक परिसरातील पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस मार्शल तैनात करावेत, अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अनुचित प्रकार घडू नयेत आणि विद्यार्थिनींना निर्भय वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दरम्यान, संबंधित प्रकरणातील सहा आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत ताब्यात घेऊन कारवाई केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करतानाच विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सातत्याने दक्ष राहण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे, उपजिल्हाप्रमुख अनिकेत पवार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अक्षय अमराळे, भोर विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष उमेश बुक्कनकर, शरद यादव यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





