
पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना अपघातग्रस्त सेवकांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. या योजनेंतर्गत महापालिकेच्या आरोग्य कार्यालयातील लिपिक टंकलेखक श्री. हरिश्चंद्र श्रीरंग गोरे यांना ६ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर यांच्या हस्ते बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना धनादेश प्रदान करण्यात आला.
श्री. गोरे यांचा २४ नोव्हेंबर २०२५ रोजी अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे दोन पेरे तुटले होते. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेंतर्गत त्यांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेकडून सन २०१६ पासून कायम आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या कामगार कल्याण विभागामार्फत आजपर्यंत २६ सेवकांना व त्यांच्या वारसांना एकूण २ कोटी ८५ हजार रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या धनादेश वितरणप्रसंगी कामगार कल्याण विभागाचे खातेप्रमुख तथा मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे उपस्थित होते. मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल श्री. गोरे यांनी पुणे महानगरपालिकेचे आभार मानले.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अपघातामुळे ओढवणाऱ्या आर्थिक संकटात विमा योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात दिला जात असल्याने, अशा योजनांचे महत्त्व अधोरेखित होत आहे.





