
पौड (प्रतिनिधी)
मुळशी:- मुळशी तालुक्यातील पाणीप्रश्न आणि धरणग्रस्तांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी आता मुळशीकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थानिक गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासह धरणग्रस्तांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी माले येथून मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी निषेध दिंडी काढण्यात येणार आहे. शनिवार, दि. ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाचा समारोप रविवार, दि. १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
या दिंडीमध्ये २५ बैलगाड्या आणि १० ट्रॅक्टर सहभागी होणार असून, मुळशी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे यांनी केले आहे.
मुळशीतील गावांची तहान भागविण्यासाठी २ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, या प्रमुख मागण्यांसाठी यापूर्वी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान पौड तहसीलदार कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नसल्याने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
दरम्यान, मुळशी धरणातील ८ टीएमसी पाणी पुणे शहरासह दौंड तालुक्याला देण्याचे नियोजन केले जात असताना मुळशीतील स्थानिक गावांच्या पाण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. पुण्याला पाणी देण्याचे नियोजन केले जाते; मात्र ज्या मुळशीच्या भूमीत धरण उभारले गेले, त्या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहणे ही गंभीर बाब असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुळशीकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर ठोस निर्णय झाला नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुडधे यांनी सांगितले. त्यामुळे आता टाटा प्रशासन आणि शासन दरबारी संघर्ष करावा लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुळशीकरांना पाणी मिळण्याबरोबरच धरणग्रस्तांचे प्रश्नही मार्गी लागले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुडधे, माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सचिन कोंढाळकर, संजय हुंडरे, रमेश पडवळ, अनंता कंधारे, विजय भालेराव, शांताराम शिर्के आणि अक्षय कंधारे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमधील पाणीप्रश्नही सध्या गंभीर बनला असून, स्थानिक जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता मुळशीकरांच्या हक्काचे पाणी आणि धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविल्याशिवाय आंदोलन थांबविणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.





