Homeदेश/ विदेशपुणे ग्रँड टूर २०२७च्या तयारीला गती; ९० देशांतील स्पर्धकांचा सहभाग.

पुणे ग्रँड टूर २०२७च्या तयारीला गती; ९० देशांतील स्पर्धकांचा सहभाग.

पुणे प्रतिनिधी

पुणे:-पुणे ग्रँड टूर २०२७च्या आयोजनाच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेण्यात आली. आदरणीय अजितदादांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या पुणे ग्रँड टूरने अल्पावधीतच जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी २०३२ वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर २०२७ मधील स्पर्धेची व्याप्ती वाढली असून, तब्बल ९० देशांमधून स्पर्धकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ही बाब पुणे ग्रँड टूरच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचे द्योतक आहे.

आगामी स्पर्धा अधिक भव्य, दर्जेदार आणि जागतिक स्तरावरील निकषांनुसार यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध तयारी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. मागील वर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले

पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच गुणवत्तेवर भर देण्याबाबत चर्चा झाली. एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक यंत्रणा किंवा एजन्सी काम करत असतील, तर समन्वय साधून कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

स्पर्धेच्या कालावधीत वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, नागरिकांना तसेच प्रवाशांना वाहतूक बदलांची वेळेत माहिती देणे, रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना राबविणे आणि जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून आवश्यक सुधारणा करणे, या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे सांगण्यात आले. याशिवाय रस्त्यांची देखभाल, स्वच्छता आणि स्पर्धेच्या मार्गावरील परिसर सुस्थितीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी आगाऊ तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले.

या संपूर्ण आयोजनासाठी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी परस्पर समन्वयातून काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. पुणे ग्रँड टूर ही पुण्याला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारी स्पर्धा असून, यंदाची स्पर्धा अधिक भव्य, सुरक्षित, दर्जेदार आणि यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments