
वाकड- ( प्रतिनिधी)
१७ नोव्हेंबर २०२६
वाकड:- पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरात झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, पुनावळे व ताथवडे येथे मंजूर झालेली सब-पोस्ट ऑफिस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये आयुक्तांना पत्र देऊन जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.
भारत सरकारकडून पुनावळे आणि ताथवडे येथे स्वतंत्र सब-पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार पुनावळेसाठी ४११०८६, ताथवडेसाठी ४११०८७, तर वाकड परिसरासाठी ४११०८८ हे स्वतंत्र पिनकोड निश्चित करण्यात आले आहेत. स्वतंत्र पिनकोडमुळे या परिसरातील टपाल सेवांचे महत्त्व वाढले असून, नागरिकांना स्थानिक पातळीवरच टपाल कार्यालयाची सुविधा मिळणे आवश्यक झाले आहे.
मात्र, पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर सब-पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आवश्यक जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध जागांचा विचार करून टपाल विभागाला अल्पदरात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली आहे.
सध्या टपाल कार्यालयाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना इतर भागांत जावे लागत आहे. स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना टपाल सेवा, आर्थिक व्यवहार आणि इतर पोस्ट ऑफिसविषयक सुविधा परिसरातच उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी टपाल सेवा अधिक सुलभ आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. मंजूर सब-पोस्ट ऑफिस लवकरात लवकर कार्यान्वित व्हावीत आणि महापालिका प्रशासनाने जागेचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले.





