
पुणे (प्रतिनिधी)
पुणे शहर:- ‘सन्मान राष्ट्रगीताचा, अभिमान पुणेकरांचा!’ या संकल्पनेतून वंदे मातरम् राष्ट्रगीताच्या सार्धशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शनिवारवाडा येथे भव्य दीपप्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तब्बल ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित करून पुण्याच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद करण्यात आली. हजारो पणत्यांच्या तेजाने शनिवारवाडा उजळून निघाला आणि पुणेकरांच्या एकजुटीचा, राष्ट्रप्रेमाचा व अभिमानाचा ऐतिहासिक क्षण साकार झाला.
या भव्य सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या ५० वीरमाता आणि वीरपत्नींचा विशेष सन्मान करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यात आले. या सन्मान सोहळ्याने उपस्थितांच्या मनात देशभक्ती आणि अभिमानाची भावना जागृत केली.
या कार्यक्रमाला मंत्री माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर परशराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, ब्रिगेडियर तरुणेश, कर्नल विकास सावळजे, कर्नल श्रीनिवास सातवळेकर, कर्नल राजेशकुमार जिंदाल, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता शेकटकर, उपायुक्त टेंगळे, नगरसचिव योगिता भोसले, मुख्य अभियंता बिपीन शिंदे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक-नगरसेविका, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत परीक्षक स्वप्नील डांगरीकर यांनी या विक्रमाची अधिकृत घोषणा करून प्रमाणपत्र प्रदान केले. त्यामुळे या दीपप्रज्वलन सोहळ्याला जागतिक स्तरावर ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक वास्तूच्या साक्षीने साकारलेला हा विक्रम केवळ पणत्यांच्या संख्येपुरता मर्यादित नसून, पुणेकरांची एकजूट, राष्ट्रप्रेम, भारतीय संस्कृती आणि भारतीय सैन्यदलाप्रती असलेली कृतज्ञता यांचे प्रतीक ठरला. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या सर्व पुणेकरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.





