
पौड (प्रतिनिधी)
मुळशी:- धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई-बंगळूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या धरणग्रस्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घोटावडे फाटा येथे रोखले. यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
धरणग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अमित कंधारे यांनी दिला. धरणग्रस्त कृती समितीच्या माध्यमातून सोमवारी महामार्ग अडविण्याचा इशारा देण्यात आला होता.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन कार्यक्रम होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घोटावडे फाटा येथे अडविले. त्यानंतर कार्यकर्त्यांना पिरंगुट पोलीस चौकीत नेण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे, माजी पंचायत समिती सदस्य भगवान नाकती, अनंता कंधारे, रमेश पडवळ, संजय हुंडारे, सचिन कोंढाळकर, दत्ता दिघे, गोविंद सरसुळे, विशाल शेलके, अनंता सोनार, नीलेश धनवडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पोलीस परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समज देऊन नंतर सोडून दिले.





