
(वाकड प्रतिनिधी) |
पिंपरी चिंचवड:- वाकड येथे नगरसेवक राहुल तानाजी कलाटे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. कमल प्रतिष्ठान माउंट लिटेरा स्कूल येथे झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
भारतीय संगीतपरंपरेचा वारसा जपत नागरिकांना दिवाळीनिमित्त सांस्कृतिक मेजवानी अनुभवता यावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलभाताई उबाळे, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, आपल्या भागातील नागरिकांना एकत्र आणून भारतीय संगीतपरंपरेचा आनंद घेता यावा, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मान्यवर, नागरिक आणि रसिकांचे त्यांनी आभार मानले.





