
वाकड प्रतिनिधी
वाकड:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वच्छता व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतानाच, शहरातील प्रत्यक्ष कचरा व्यवस्थापनाच्या परिस्थितीवर महापालिका प्रशासनाने आत्मपरीक्षण करावे, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, नव्या क्षेत्रीय कार्यालयांना अपुऱ्या सुविधा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन व बोनस यावर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळत असताना अनेक भागांमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचे सांगत राहुल कलाटे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नसून, संबंधित परिसरातील नगरसेवकांकडून आंदोलन सुरू आहे. तसेच नव्याने निर्माण झालेल्या क्षेत्रीय कार्यालयांना कचरा संकलनासाठी आवश्यक वाहने, कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शहरातील कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करताना केवळ पुरस्कारापुरता विचार न करता संपूर्ण शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
नवीन क्षेत्रीय कार्यालयांना सुविधा द्या नवीन क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने, यंत्रसामग्री आणि निधी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अपेक्षित सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. केवळ कार्यालये सुरू करून चालणार नाही, तर त्यांना सक्षम करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे, असे राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन व बोनस प्रलंबित
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता व आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतन आणि बोनसचा मुद्दाही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. दिवाळीसारख्या सणाच्या काळातही कर्मचाऱ्यांना वेतन व बोनस न मिळणे ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगत, या कामगारांच्या मेहनतीचा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
शहराच्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्काराच्या श्रेयाबरोबरच त्यांच्या हक्काचे वेतन आणि सन्मानही मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.आंदोलनाचा इशारा
कचरा व्यवस्थापन, नवीन क्षेत्रीय कार्यालयांना आवश्यक सुविधा, निधी आणि कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही राहुल कलाटे यांनी दिला.





