Homeसाहित्य/शैक्षणिकइतरदसऱ्याच्या रात्री काळाचा घाला; भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी.

दसऱ्याच्या रात्री काळाचा घाला; भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी.

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहर:- दसऱ्याचा सण आनंदात साजरा करण्यासाठी आणि व्यावसायिक कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या चार मित्रांचा प्रवास काळाने मध्येच संपवला. कोल्हापूर येथे व्यावसायिक कामे उरकून महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर गावाकडे परतणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा कराड येथील युनिक उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. भरधाव स्कॉर्पिओने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. दसऱ्याच्या रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात सयश शशिकांत चिंचकर (वय २१), रोहित दादासो धोत्रे (वय २१), तेजस तानाजी देशमुख (वय २६) आणि सागर जालिंदर निंबाळकर (वय २६) या चार तरुणांचा मृत्यू झाला. अमन तांबोळी (वय २४), अर्णव दाभाडे (वय १५) आणि शंतनू शिंगाडे (वय २०) हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण कोल्हापूर येथे व्यावसायिक कामानिमित्त गेले होते. त्यापैकी काही जणांना फटाक्यांचा स्टॉल सुरू करण्यासाठी ऑर्डर द्यायची होती, तर एका तरुणाला चहाच्या व्यवसायासाठी फ्रँचायझी घेण्याच्या संदर्भात काम करायचे होते. ही कामे पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते गावाकडे परतण्यासाठी निघाले होते.

प्रवासादरम्यान कराड येथील शिवराज ढाब्यावर जेवण करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, ढाब्यापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. नियोजित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या प्रवासाचा दुर्दैवी शेवट झाला.

स्कॉर्पिओ आणि ट्रक यांच्यातील धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओ गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली असून, चार तरुणांच्या अकाली निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.दसऱ्याच्या आनंदात घराबाहेर पडलेल्या तरुणांच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सणाच्या उत्साहावर दुःखाची छाया पसरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments