
सोलापूर:- सोलापूर जिल्ह्यात शिवसेना सोशल मीडिया विभागाने संघटनात्मक विस्ताराला गती दिली असून, शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक दादा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्कप्रमुख अमित पाटील यांच्या पुढाकारातून आतापर्यंत तब्बल २६१ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमांच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा, जनहिताची भूमिका आणि पक्षाचे कार्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हा विस्तार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पंढरपूर येथे आज शिवसेना सोशल मीडिया सोलापूर विभागाची जिल्हा आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. सोशल मीडिया हे जनतेशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम बनले असून, या माध्यमाचा वापर अधिक नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या २६१ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका, पक्षाचे उपक्रम आणि जनहिताशी संबंधित विषय समाजमाध्यमांवर पोहोचविण्याचे काम सुरू आहे. आगामी काळातही पक्षाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचवावे, तसेच संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीला नगराध्यक्षा प्रणिता भालके, जिल्हाप्रमुख चरणराज चौरे, दिग्विजय शहाजीबापू पाटील, शिवाजी सावंत, शिवाजी बाबर, महादेव सलवदे, आशिष पढायार, यश रणभोर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.





