
पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. निवडणुकीतील पराभवावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप अधिक वाढू नयेत, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना वाद न वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर भाजपच्या गोटात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मते भाजपच्या उमेदवाराला मिळाली नसल्याचा आक्षेप भाजपच्या काही नेत्यांकडून घेतला जात आहे. तसेच निवडणूक प्रचाराच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी काढलेल्या पत्रकांचाही निकालावर परिणाम झाल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे.
दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे मंगेश चिवटे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपने हा मतदारसंघ स्वतःकडे घेतल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मतदारसंघाच्या वाटपावरून असलेली ही नाराजी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर पुन्हा चर्चेत आली आहे.
याशिवाय, पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचा एका वृत्तपत्राशी असलेला संबंधही निवडणूक प्रचारात चर्चेचा विषय ठरला होता. संबंधित वृत्तपत्राने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षपाती भूमिका घेतल्याचा, तसेच पेड न्यूज आणि दलाल नेमल्याचा आरोप शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यामुळे निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिवसेनेतील राजकीय वातावरण अधिक तापले होते. निकालानंतरही या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा सुरूच राहिली.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आता सावध भूमिका घेत पक्षातील नेत्यांना वाद वाढवू नका, अशा सूचना दिल्याचे समजते. महायुतीमध्ये कोणताही बिघाड होऊ नये आणि दोन्ही पक्षांमधील संबंध कायम राहावेत, यासाठी शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेली नाराजी, मतांच्या हस्तांतरणावरून उपस्थित झालेले प्रश्न आणि प्रचारादरम्यान झालेले आरोप यावर भाजपची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदे यांच्या सूचनांनंतर महायुतीतील हा वाद शांत होणार की पुन्हा नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





