
पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालि पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपुरवठा आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या गावांमधील नागरी सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि आशियाई विकास बँक (ADB) यांच्यात अर्थसहाय्य व तांत्रिक सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समाविष्ट उर्वरित १४ गावांमधील पाणीपुरवठा प्रकल्पांना प्राधान्य देण्यासह आवश्यक भागांमध्ये पावसाळी पाणी निचरा व्यवस्था विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पांसाठी निधी उभारणीचे पर्याय, तांत्रिक मदत आणि प्रकल्पांच्या पूर्वतयारीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
या बैठकीला आशियाई विकास बँकेच्या जल व नागरी विकास विभागाचे संचालक श्री. सातोशी डशी, खासगी क्षेत्र कार्य विभागाचे संचालक श्री. मयंक चौधरी, वरिष्ठ नागरी विकास विशेषज्ञ (वित्त व गुंतवणूक) श्रीमती मक्ता मल्होत्रा यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीत सहभागी झाले.
शहराच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर या गावांमध्ये पाणीपुरवठा आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासारख्या मूलभूत सुविधांचे नियोजनबद्ध बळकटीकरण करणे महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने प्रकल्पांना आर्थिक व तांत्रिक आधार मिळवून देण्याच्या दृष्टीने झालेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.





