
(मुळशी प्रतिनिधी)
मुळशी:- तालुक्यातील घोटवडे फाटा–पिरंगुट मार्गावर रस्त्याच्या कडेला दिवसभर बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने आधीच उपलब्ध असलेला रस्ता अधिक अरुंद होत असून, वाहनचालकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच अपघाताचा धोकाही वाढत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
घोटवडे फाटा–पिरंगुट हा मार्ग मुळशी तालुक्यातील दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने तसेच स्थानिक नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. मात्र, रस्त्याच्या बाजूला वाहने लांबच लांब रांगेत उभी केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली जागा कमी होते. परिणामी, समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चालकांची कसरत होत असून, काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता निर्माण होते.
रस्त्यावर पार्किंग की नागरिकांच्या जीवाशी खेळ?
रस्त्याच्या कडेला दिवसभर वाहने उभी राहिल्याने रस्त्याची प्रत्यक्ष रुंदी कमी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी एखादे वाहन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना समोरून दुसरे वाहन आल्यास दोन्ही वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण होऊ शकते. विशेषतः दुचाकीस्वारांना अशा परिस्थितीत धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे केवळ वाहतुकीचा खोळंबाच होत नाही, तर वाहनचालकांचा वेळ वाया जाणे, अनावश्यक हॉर्नचा आवाज, वाहतुकीत अडथळे आणि किरकोळ धडक होण्याचा धोका अशा समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. या मार्गावर वाहनांची गर्दी असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची वाढली शक्यता आहे. तरी लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन उपयोजना करावेत.





