
पौड( प्रतिनिधी)
दिनांक 31/10/ 2026
मुळशी : मुळशी धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने धरणग्रस्तांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुळशी धरणग्रस्त कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून, मागण्यांवर चर्चा करण्यासाठी टाटाचे वरिष्ठ अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांची तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी बालेवाडी स्टेडियमजवळ मुंबई-बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य अमित कंधारे यांनी स्पष्ट केले.
मुळशी धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी कृती समितीच्या माध्यमातून कंधारे यांनी ८ ते १६ ऑगस्टदरम्यान पौड तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण केले होते. त्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या मध्यस्थीने टाटाच्या प्रतिनिधींनी चर्चेद्वारे मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले; मात्र अडीच महिने उलटूनही प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने धरणग्रस्तांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मुळशीकरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेतीसाठी दोन टीएमसी पाणी, तसेच जलशुद्धीकरण केंद्रासाठी वळणे येथे पाच एकर जागा उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. याशिवाय धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या गावठाणासाठी जागा मिळावी, माळे आयटीआयला पूर्वीप्रमाणे ७५ लाख रुपयांचे अनुदान मिळावे आणि माळे येथील सेनापती बापट विद्यालयात अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी पाच एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच धरण परिसरातील गावांच्या विकासासाठी टाटाने सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा, वडगाव व वाघवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना हक्काची घरे मिळावीत, यांसह विविध मागण्या प्रलंबित आहेत.
प्रशासन आणि टाटा कंपनीने तातडीने बैठक घेऊन मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा सोमवारच्या महामार्ग आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुळशी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.





