
पुणे:-प्रतिनिधी
मुंबई:-ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी रात्री मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कथित ऑडिओ क्लिपमधील बाबींची सत्यता तपासून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. संबंधित प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी योग्य ती चौकशी होणे आवश्यक असल्याचेही निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले.
या शिष्टमंडळात खासदार मिलिंद देवरा, खासदार रवींद्र वायकर, आमदार हेमंत पाटील, शिवसेनेचे सरचिटणीस तथा माजी खासदार राहुल शेवाळे आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाच्या चौकशीसाठी शिवसेनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिल्याने या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





