
मुळशी प्रतिनिधी:-
पुणे:- पुणे शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शुक्रवार, २३ ऑक्टोबरपासून दंडात्मक कारवाई पुन्हा सुरू केली आहे. चलन मशीनच्या वापरावरील स्थगितीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात अडचणी येत होत्या. आता पुन्हा कारवाई सुरू झाल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारला जाणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, एकेरी मार्गावर नियमांचे उल्लंघन करणे आणि रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करणे अशा प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते.
शहरातील जे. एम. रोड, एफ. सी. रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, आळंदी रोड तसेच जुन्या पुण्यातील काही भागांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम काटेकोरपणे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, टोईंग व्हॅनची कारवाई मात्र संबंधित कंत्राटाचे नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत सुरू होणार नसल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये आणि वाहनांचे पार्किंग करताना इतरांना अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.





