
मुळशी : स्वर्गीय सुभाषभाऊ अमराळे सोशल फाउंडेशन, अंबडवेट यांच्या वतीने भव्य निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये लेखनकौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिक विषयांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेसाठी एकूण २० हजार रुपयांची रोख पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी तीन गट निश्चित करण्यात आले आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला गट, सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा गट, तर सर्वांसाठी खुला गट असा तिसरा गट असणार आहे. या तीन गटांसाठी अनुक्रमे ‘माझी आवडती सहल’, ‘उत्सव असे साजरे करावेत’ आणि ‘माझ्या स्वप्नातील मुळशी पॅटर्न’ हे निबंधाचे विषय निश्चित करण्यात आले आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पात्र स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी २० ऑक्टोबरपर्यंत निबंध पाठविण्याचे आवाहन
स्पर्धकांनी निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणे आवश्यक असून, टाइप केलेले निबंध स्वीकारले जाणार नाहीत. निबंध ए-४ आकाराच्या कागदावर एका बाजूने योग्य समास सोडून स्वच्छ अक्षरात लिहावा. निबंधामध्ये आक्षेपार्ह, राजकीय किंवा विषयाशी असंबंधित मजकूर असल्यास संबंधित नोंद अपात्र ठरविण्यात येईल.
स्पर्धकांनी आपला निबंध पीडीएफ (PDF) स्वरूपात तयार करून २० ऑक्टोबर २०२६पर्यंत आयोजकांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवायचा आहे. निबंधाच्या शेवटच्या पानावर स्पर्धकाचे नाव, शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव, इयत्ता, गट आणि व्हॉट्सॲप क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम कुठे आयोजित केला जाणार आहे, याची माहिती स्पर्धकांना स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे. या स्पर्धेसंदर्भातील सर्व निर्णय आयोजकांचे अंतिम राहतील.
संपर्कासाठी क्रमांक
९१५८०३९७९७,९८५०६७२६७२, ९९२२४४३६३६
या निबंध लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांसह खुल्या गटातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन आपल्या लेखनकौशल्याला संधी द्यावी, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रदीप गावडे यांनी केले आहे.





