
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहर आणि महानगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आयआयएम मुंबईकडून वाहतूक व्यवस्थेचा सर्वंकष अभ्यास करण्यात येणार आहे. यासंदर्भात आयआयएम मुंबईच्या तज्ज्ञांसह विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
पुणे महानगर परिसराची लोकसंख्या सध्या सुमारे एक कोटी असून, पुढील तीन दशकांत ती दोन कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच, नोंदणीकृत वाहनांची संख्या ८१ लाखांवर गेली असून, दररोज १,३०० हून अधिक नवीन वाहनांची भर पडत आहे.
या अभ्यासात प्रमुख रस्ते, वाहतूक कोंडीची ठिकाणे, सिग्नल यंत्रणा, मेट्रो आणि पीएमपीएमएल सेवांचा समन्वय, प्रस्तावित रिंगरोड तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा आढावा घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या अभ्यासामुळे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
या बैठकीला पोलीस प्रशासन, आयआयएम मुंबई, महामेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, एनएचएआय, आरटीओ, एमएसआयडीसी आणि पीएमपीएमएलचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अभ्यासातून पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यावर भर दिला जाणार आहे.





