
पुणे प्रतिनिधी:- शहरात जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा मार्गावरील रस्त्यांवर होणाऱ्या खोदकामांबाबत पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
सेवा वाहिन्या टाकण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांचा आढावा घेत अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींना खोदकामासंदर्भातील SOP चे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी १ वाजता झालेल्या संयुक्त बैठकीत पथ विभाग, एमएनजीएल आणि दिनेश इंजिनिअरिंगसह संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेसाठी शहरातील रस्ते आणि स्पर्धा मार्ग सुस्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने सेवा वाहिन्यांच्या कामांचे नियोजन आणि खोदकामाच्या नियमांचे पालन हा बैठकीतील महत्त्वाचा विषय होता.
या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, अधीक्षक अभियंता अजय वायसे तसेच एमएनजीएल आणि दिनेश इंजिनिअरिंग कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.





