Homeआरोग्यमस्ती करणाऱ्या चिमुकल्याला शाळेच्या बाथरूममध्ये डांबले युरो किड्समधील शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा.

मस्ती करणाऱ्या चिमुकल्याला शाळेच्या बाथरूममध्ये डांबले युरो किड्समधील शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा.

पुणे : घोरपडी येथील युरो किड्स शाळेत मस्ती केल्याच्या कारणावरून तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला शिक्षिकेने स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पालकांनी तक्रार दिल्यानंतर मुंढवा पोलिसांनी संबंधित शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी सव्वादोनच्या दरम्यान बी. टी. कवडे रस्त्यावरील युरो किड्स शाळेत ही घटना घडली. शाळेत मस्ती केल्यामुळे शिक्षिकेने मुलाला स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याचा आरोप आहे. याबाबत पालकांनी विचारणा केली असता, मुलाला काही वेळ स्वच्छतागृहात बंदिस्त ठेवल्याची कबुली संबंधित शिक्षिकेने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

शाळेतील व्यवस्थापनाने दाखविलेल्या सीसीटीव्ही चित्रिकरणातही हा प्रकार कैद झाल्याचे समोर आले आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी हे चित्रिकरण ओव्हरराइट झाल्याचे व्यवस्थापनाने सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी पालक शाळेत गेले असता, मुलाने मस्ती केल्यामुळे शिक्षिकेने त्याला स्वच्छतागृहात बंद केल्याचे समोर आले. रडणाऱ्या मुलाला आईने विचारणा केली असता, त्याने आपल्याला स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पालकांनी शिक्षिकेकडे विचारणा केली असता, मुलगा खूप मस्ती करत होता आणि दुसरीकडे जागा उपलब्ध नसल्याने त्याला काही वेळासाठी बंद केल्याचे शिक्षिकेने सांगितल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे सीसीटीव्ही चित्रिकरण दाखविण्याची मागणी केली. मात्र, व्यवस्थापनाकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. पालकांनी पाठपुरावा केल्यानंतर २१ सप्टेंबर रोजी त्यांना सीसीटीव्ही चित्रिकरण दाखविण्यात आले. त्यामध्ये शिक्षिका मुलाला स्वच्छतागृहात बंद करताना दिसल्याचे पालकांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी संबंधित चित्रिकरणाची प्रत मागितली असता, रेकॉर्डिंग ओव्हरराइट झाल्यामुळे ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुंढवा पोलिसांनी संबंधित शिक्षिका आणि शाळेच्या व्यवस्थापिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शाळांमधील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments