Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरश्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी; यांची एकमताने निवड!

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी; यांची एकमताने निवड!

पुणे:- महेश सूर्यवंशी यांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या कार्यातील प्रवास अनेक दशकांचा आहे. सन १९८४ मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर १९९६ मध्ये मंडळाच्या कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली, तर २००१ मध्ये त्यांची ट्रस्टच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. २०१० मध्ये त्यांनी ट्रस्टच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. आता अध्यक्षपदाच्या माध्यमातून ते ट्रस्टच्या कार्याला नवी दिशा देणार आहेत.

आर्थिक शिस्त, उत्तम व्यवस्थापन आणि मानवसेवेचा ध्यास
बी.ई. सिव्हिल शिक्षण घेतलेले महेश सूर्यवंशी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. वित्तीय कामकाजातील काटेकोरपणा, सुसूत्रता आणि प्रभावी व्यवस्थापन ही त्यांची प्रमुख कार्यवैशिष्ट्ये मानली जातात. ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांतर्गत कोंढवा येथे उभारण्यात आलेल्या बालसंगोपन केंद्र आणि वृद्धाश्रमाच्या वास्तूच्या उभारणीत त्यांनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

विशेष म्हणजे, त्यांचे वडील अॅड. शंकरराव सूर्यवंशी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे संस्थापक कोषाध्यक्ष होते. त्यामुळे गणेशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि ट्रस्टच्या कार्याचा वारसा त्यांना लाभला आहे.

२०३१ नंतर हेमंत रासने यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा
ट्रस्टच्या आगामी नेतृत्वाबाबतही नियोजन करण्यात आले आहे. सन २०२६ ते २०३१ या कालावधीत महेश सूर्यवंशी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार असून, सन २०३१ ते २०३६ या पुढील पाच वर्षांसाठी आमदार हेमंत रासने हे अध्यक्षपद भूषवणार आहेत.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. या बैठकीला उपाध्यक्ष माणिक चव्हाण, डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त राजेंद्र गावडे, पराग वांबूरे, रोहित लोंढे यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते.

पुण्यातील प्रसिद्ध गणेशोत्सव परंपरेला सामाजिक सेवेची जोड देत, आर्थिक शिस्त आणि मानवसेवेचा विचार केंद्रस्थानी ठेवून ट्रस्टच्या आगामी वाटचालीत महेश सूर्यवंशी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments