
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नारायण पेठ येथील भोलेनाथ मित्र मंडळाने यंदा भाविकांसाठी नेपाळमधील सुप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची भव्य व आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्याच्या माध्यमातून नेपाळच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख पुणेकरांना करून देण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
पशुपतिनाथ मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना, मंदिराचे प्रवेशद्वार, परिसरातील सजावट तसेच धार्मिक वातावरण यांचा बारकाईने विचार करून देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्याची भव्यता आणि आकर्षक रोषणाई यामुळे परिसरात येणाऱ्या गणेशभक्तांचे लक्ष वेधले जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या भोलेनाथ मित्र मंडळाने यंदा देखाव्याच्या माध्यमातून धार्मिक पर्यटन, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम साधला आहे. देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पुणे शहरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखाव्याची उभारणी आणि सजावटीसाठी विशेष मेहनत घेतली असून, भाविकांना देखावा पाहताना धार्मिक वातावरणाचा अनुभव मिळावा यासाठी विविध बाबींची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे नारायण पेठेतील हा देखावा गणेशोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.





