
वाकड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड:-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत स्वच्छता आणि आवराआवर सुरू असताना, वापरात नसलेल्या मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात न टाकता गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.
यासाठी महापालिकेच्या वतीने ‘आरआरआर’ (Reduce, Reuse, Recycle) केंद्रांचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या केंद्रांमध्ये जुने कपडे, खेळणी, पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, भांडी, चादरी, पडदे, फर्निचर आणि वापरण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जमा करता येणार आहेत. या वस्तूंचा पुनर्वापर केल्यामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, तसेच गरजू नागरिकांना आवश्यक वस्तू उपलब्ध होऊ शकतील.
दिवाळीच्या साफसफाईदरम्यान अनेक वस्तू वापरात नसल्यामुळे थेट कचऱ्यात टाकल्या जातात. मात्र, त्या वस्तू सुस्थितीत असतील तर त्यांचा दुसऱ्या व्यक्तीला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वस्तू फेकून देण्याऐवजी पुनर्वापराच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी नागरिकांना या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.





