
वाकड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड:-
वाकड गावातील पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सूर्या हॉस्पिटलजवळ सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी हॉस्पिटलची कंपाउंड वॉल आज पाडण्यात आली असून, या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नगरसेवक राहुल कलाटे यांनी काल संबंधित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली होती.त्यानंतर या कामाला गती मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होण्याची अपेक्षा आहे.
वाकड परिसरात पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक सुरळीत करणे आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणे आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल कलाटे यांनी सूर्या हॉस्पिटलजवळील कामाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
या कामात अडथळा ठरणारी सूर्या हॉस्पिटलची कंपाउंड वॉल हटविण्यात आली आहे. सूर्या हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि संबंधित रस्ते प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून पुलाच्या बांधकामातील अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे आता प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली आहे.
या ठिकाणी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. तसेच वाहनचालकांचा वेळ वाचणे, नागरिकांची ये-जा सुलभ होणे आणि वाकड परिसरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्त मिळणे, असे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत.
“नागरिकांची सोय, वाहतूक कोंडीतून सुटका आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास हेच आमचे प्राधान्य आहे,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. पाहणीदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वाकड गावातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे. आता पुलाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळतो, याकडे वाकडकरांचे लक्ष लागले आहे.





