
पौड प्रतिनिधी:-
पुणे-पौड कोलाड मार्गावरील पिरंगुट येथील मच्छी मार्केटसमोर शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि ॲक्टिव्हा दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तेजस रविदास भाटकर (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर (क्रमांक एमएच १४ एलबी ४६३२) पुण्याहून पौडकडे जात असताना घोटावडे फाट्याकडून येणाऱ्या ॲक्टिव्हा दुचाकीला त्याची जोरदार धडक बसली. अपघातात तेजस गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत तेजस भाटकर हा मूळचा रत्नागिरी येथील रहिवासी असून, सध्या खराडी परिसरात वास्तव्यास होता. तो एका कंपनीत नोकरीच्या मुलाखतीसाठी आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पिरंगुटमधील वर्दळीच्या मार्गावर झालेल्या या अपघातामुळे परिसरात चिंता व्यक्त होत आहे. अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट झालेली नसून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.





