
पौड : मुळशी तालुक्यातील शेतकरी सध्या तिहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतीसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे, तर दुसरीकडे मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यातच डीपी, वायरी आणि शेतीपंपांच्या मोटारी चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. अस्मानी संकटाबरोबरच चोरीच्या वाढत्या घटनांचा सामना करावा लागत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
पाऊस नाही; दुष्काळग्रस्त यादीतही मुळशीला डावलले
मुळशी तालुक्यात पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना चातकाप्रमाणे करावी लागत आहे. पावसाअभावी शेतीची कामे आणि पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असतानाही मुळशीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे शेजारील भोर आणि वेल्हे तालुक्यांचा या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे मुळशीतील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर तालुक्याला दुष्काळाच्या मोठ्या झळा बसण्याची शक्यता असून, प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत
पावसाअभावी आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतीपंप, डीपी आणि वायरी चोरीला जाण्याचा मोठा फटका बसत आहे. भरे, चांदे, मुठा, दारवली, घोटावडे, मुळखेड यासह परिसरातील विविध गावांमध्ये डीपी चोरी, वायरी चोरी तसेच मोटार चोरीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे.
अंबडवेट परिसरात तब्बल १० ते १२ शेतकऱ्यांच्या मोटारींच्या लाखो रुपये किमतीच्या वायरी चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, शेतीला पाणी देण्याची व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.
शेतकऱ्यांचे शेतीपंप, डीपी आणि वायरी चोरणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र, चोरीच्या घटनांना आळा बसत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अधिकारी बदलले, मात्र परिस्थिती बदलणार कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांचे साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांची गंभीर दखल घेऊन पौड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवावीत, चोरीच्या टोळ्यांचा शोध घेऊन संबंधितांना अटक करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत
पाऊस नाही, दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले नाही आणि त्यातच शेतीचे साहित्य चोरीला जात आहे. अशा तिहेरी संकटात मुळशीतील शेतकरी अडकला असताना प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकऱ्यांना केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदत आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. मुळशीतील शेतकऱ्यांना आता पावसाचीच नव्हे, तर प्रशासनाच्या ठोस हस्तक्षेपाचीही प्रतीक्षा आहे.





