HomeराजकीयMPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच का? मुरलीधर मोहोळ यांचा रोहित पवारांना सवाल; चर्चेनंतरही...

MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच का? मुरलीधर मोहोळ यांचा रोहित पवारांना सवाल; चर्चेनंतरही आंदोलन तीव्र.

पुणे | प्रतिनिधी

पुणे : एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत शिष्टमंडळासोबत जवळपास पावणेतीन तास चर्चा केली. या चर्चेत बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाले असताना आंदोलन अद्याप सुरूच का आहे, असा थेट सवाल मोहोळ यांनी आमदार रोहित पवार यांना केला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भातील घडामोडींवर भाष्य केले. एस. एम. जोशी पूल, अलका चौक आणि शास्त्री रोड परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, आपण प्रवासात असतानाही या आंदोलनावर लक्ष ठेवून होतो. आंदोलन सुरू होण्यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका

लोकशाही आणि संविधानाने प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या वेळोवेळी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध प्रश्न मांडले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी दुसऱ्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या शिष्टमंडळालाही जवळपास पावणेतीन तास वेळ दिला. या बैठकीत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या बहुतांश मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

एमपीएससी अध्यक्षांच्या चौकशीबाबत आश्वासन

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना मोहोळ म्हणाले की, एमपीएससी अध्यक्षांचे पद संवैधानिक स्वरूपाचे असल्याने त्यांच्या नियुक्ती आणि पदासंदर्भातील निर्णयप्रक्रिया राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्यांच्या थेट अधिकारात येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी करण्याचे आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रे सादर करण्यासाठी होणारा त्रास कमी करण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी आणि सिंगल कार्डसंदर्भातील प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुलभ व्यवस्था करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह परीक्षांसंदर्भातील मुद्द्यांचाही राधा समितीच्या माध्यमातून विचार केला जाणार असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

चर्चेनंतरही आंदोलन तीव्र का? मोहोळांचा सवाल

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी आंदोलन स्थगित करण्याबाबत समाधान व्यक्त करणारे निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनावर प्रतिनिधींच्या सह्याही होत्या. मात्र, त्यानंतर आंदोलन थांबण्याऐवजी अधिक तीव्र झाल्याचे सांगत मोहोळ यांनी रोहित पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले.

“तुम्हीच पाठवलेल्या शिष्टमंडळाने चर्चेनंतर समाधान व्यक्त केले आणि आंदोलन स्थगित करण्याची भूमिका जाहीर केली. मग त्याच प्रतिनिधींवर तुमचा विश्वास नाही का? आंदोलन पुढे सुरू ठेवण्यामागचे नेमके कारण काय?” असा सवाल त्यांनी केला.

आंदोलनात राजकीय हस्तक्षेप वाढल्याची टीका

आंदोलनस्थळी राजकीय नेत्यांच्या वाढत्या उपस्थितीवरही मोहोळ यांनी टीका केली. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे नेते येऊन भाषणे करत आहेत. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे की राजकीय अधिवेशन, असा प्रश्न पडतो,” असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा आणि स्पर्धा परीक्षांसाठी घेतलेल्या मेहनतीचा विचार होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा विचार करावा, असे आवाहन मोहोळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत संवेदनशील असून, त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी. सरकार चर्चेसाठी तयार आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवणे कितपत योग्य आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.

पुण्यात लाखो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्या मेहनतीचा, अपेक्षांचा आणि भविष्याचा विचार करून आंदोलनाबाबत योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करत मोहोळ यांनी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याची भूमिका मांडली.

आता एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन चर्चेतून मार्ग काढून थांबणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे पुण्यासह राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments