
पौड (प्रतिनिधी)
मुळशी: पौड घाटात हॉटेल ग्रीनडेलसमोर हायवा आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांना किरकोळ, तर एकाला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर हायवा चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे पौड घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. परिसरात लाल मातीची वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनांच्या वेगावर आणि चालकांच्या बेजबाबदार वाहनचालकावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
पौड घाट व परिसरात लाल मातीची वाहतूक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. भरधाव किंवा निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
अपघातानंतर हायवा चालक वाहनासह पसार झाल्याची माहिती समोर आल्याने संबंधित चालकाचा शोध घेऊन घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. अपघाताचे नेमके कारण, जखमींची स्थिती तसेच संबंधित वाहनाची माहिती अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
पौड घाटातील अवजड वाहनांची वाहतूक सुरक्षित व्हावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.





