Homeअर्थ/उद्योगमाण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी; ३ नोव्हेंबरकडे पुणेकरांचे लक्ष.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी; ३ नोव्हेंबरकडे पुणेकरांचे लक्ष.

पौड प्रतिनिधी
पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनच्या उद्घाटनासाठी ३ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावित पुणे दौरा पुढे ढकलण्यात आला असला, तरी त्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने मेट्रोचे उद्घाटन करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कार्यक्रमाबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीत सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला पुणे शहराशी जोडणाऱ्या या प्रकल्पामुळे आयटी कर्मचाऱ्यांसह नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासाठी यापूर्वीही विविध तारखांची चर्चा झाली होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते. आता ३ नोव्हेंबरला उद्घाटन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधानांचा पुणे दौरा पुढे ढकलल्याने उद्घाटनाच्या तारखेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पंतप्रधान ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाल्यास नियोजित कार्यक्रम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तथापि, कार्यक्रमाचे अंतिम स्वरूप आणि उद्घाटनाची तारीख याबाबत अधिकृत माहिती जाहीर होणे बाकी आहे.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या मार्गावरील २३ स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यात किती स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार, याबाबतही उत्सुकता आहे.

ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना पर्यायी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

मेट्रोच्या उद्घाटनापेक्षाही प्रत्यक्ष प्रवासी सेवा कधी सुरू होणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच उद्घाटनाची तारीख आणि प्रवासी सेवेसंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments