
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा बाणेर-पाषाण लिंक रोड अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकला आहे. तब्बल १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम निवाडा जाहीर झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
पुणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार (DP) मौजे पेठ पाषाण, ता. हवेली येथील सर्व्हे क्रमांक १३४ (पै), १३५ ते १३८ आणि १४० मधून जाणारा ३६ मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता भूसंपादनाअभावी अनेक वर्षांपासून रखडला होता. त्यामुळे बाणेर-पाषाण तसेच लगतच्या परिसरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत होता.
या महत्त्वाकांक्षी रस्त्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेकडून संबंधित जमीनधारकांना सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम अदा अथवा वर्ग करण्यात आली आहे. कायदेशीर आणि आर्थिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अंतिम निवाडा जाहीर करण्यात आला.
त्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित जागेवर प्रत्यक्ष जाऊन अधिकृत ताबा घेण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या दीड दशकापासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष कामाच्या दिशेने गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“”वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा””
बाणेर-पाषाण लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे परिसरातील वाहतुकीचे पर्यायी जाळे मजबूत होऊन प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त निखिल मोरे, संबंधित अभियंते तसेच मालमत्ता, बांधकाम आणि पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
विशेष भूमिसंपादन अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील समन्वयामुळे भूसंपादनाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
रस्त्याच्या कामाला आता गती
प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथ विभागाकडून उर्वरित रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. हा मार्ग शक्य तितक्या लवकर नागरिकांसाठी खुला करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार असून, त्यामुळे बाणेर-पाषाण परिसरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल होण्याची अपेक्षा आहे.





