
पुणे प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात दुचाकींच्या घर्षणावरून झालेल्या वादातून एका ५२ वर्षीय वकिलावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वानवडी येथील शहीद अशोक कामटे उद्यानाजवळ हा प्रकार घडला. वकील लतीफ शेख यांचा मुलगा हुजैफ याच्या दुचाकीचा अक्षय धुमाळ याच्या दुचाकीला स्पर्श झाल्यानंतर वाद सुरू झाला.
या वादातून अक्षयने हुजैफला मारहाण केल्याचा आरोप आहे.मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून लतीफ शेख यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर अक्षय धुमाळ याने आणखी दोघांना बोलावल्याचा आरोप असून, तिघांनी मिळून लतीफ शेख यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे माहिती समोर आली आहे. या घटनेत त्यांच्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या लतीफ शेख यांना पुढील उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांनीही जखमी वकिलांची भेट घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.
या प्रकरणी अक्षय धुमाळ, आशिष धुमाळ आणि सागर देऊर या तिघांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. वानवडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह गुन्हा नोंदवला असून, आरोपींची चौकशी सुरू आहे. न्यायालयाने त्यांना २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
कर्तव्य बजावणाऱ्या वकिलांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत कायदे क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वकिलांकडून करण्यात येत आहे. वकिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी कायदेशीर संरक्षणाची गरज असल्याचाही मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे.





