Homeअर्थ/उद्योगशेतकऱ्यांना धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करा: सभापती मंदाताई शेळके आक्रमक; पौड पोलीस ठाणे...

शेतकऱ्यांना धमकावणाऱ्यांचा बंदोबस्त करा: सभापती मंदाताई शेळके आक्रमक; पौड पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात निवेदन.

मुळशी | प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील कातरखडक, खांबोली, पिंपळोली आणि रिहे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून प्रस्तावित वीजवाहिनी व टॉवर उभारणीच्या कामासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना धमकावणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी सभापती मंदाताई बाबाजी शेळके व ग्रामस्थांच्या वतीने पौड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. तसेच संबंधित कंपनीच्या कामाबाबत आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयातही निवेदन सादर करण्यात आले.

प्रस्तावित वीजवाहिनी व टॉवर उभारणीच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होऊ नये, त्यांच्या संमतीचा आणि हक्कांचा योग्य विचार व्हावा, तसेच स्थानिक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना सामोरे जावे लागू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका सभापती मंदाताई बाबाजी शेळके व ग्रामस्थांनी मांडली.

शेतकऱ्यांची जमीन, त्यांचे हक्क आणि त्यांचा सन्मान यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यास त्याविरोधात ठामपणे आवाज उठवला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आता या प्रकरणात प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे कशा प्रकारे निराकरण होते, याकडे कातरखडक, खांबोली, पिंपळोली व रिहे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments