
पुणे | प्रतिनिधी
पुणे:- शहरातील रस्त्यांचा दर्जा, टिकाऊपणा आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य भवनात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रस्ते विकासकामांचा तसेच सुरू असलेल्या कामांच्या दर्जाचा आणि टिकाऊपणाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये प्रामुख्याने बाणेर रोड आणि गणेशखिंड रोडवरील मेट्रो मार्ग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यासोबतच प्रलंबित कामे, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, रस्ते सुरक्षेचे उपाय आणि सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे, रस्त्यांचा टिकाऊपणा वाढणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध होणे, या दृष्टीने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रस्ते विकासकामांमुळे वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करणे तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेऊन कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे, हे या बैठकीतील प्रमुख विषय ठरले.
पुणे शहरात वाढती वाहतूक आणि सुरू असलेली विकासकामे लक्षात घेता रस्त्यांचा दर्जा सुधारणे, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, संबंधित यंत्रणा आणि प्रकल्प प्रतिनिधी यांच्यातील समन्वयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
आता पुणेकरांचे लक्ष रस्ते विकासकामांच्या गुणवत्तेत होणाऱ्या सुधारणांकडे आणि प्रलंबित कामे मार्गी लागण्याकडे लागले आहे. या आढावा बैठकीतून शहरातील रस्ते अधिक दर्जेदार, टिकाऊ आणि सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.





