
पौड प्रतिनिधी |
मुळशी:- माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. श्री. अमित दादा कंधारे यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढावळे येथे विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हरिकीर्तन सोहळा, भव्य रक्तदान शिबिर, नऊ दिवस रंगलेला ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम तसेच बालकांसाठी बाल जत्रा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते बाल जत्रा उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कोंढावळे येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात, हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजित समस्त ग्रामस्थ मंडळी आणि ग्रुप ग्रामपंचायत कोंढावळे-कळमशेत यांच्या वतीने करण्यात आले होते.
या सोहळ्यात नाशिक येथील कीर्तनकार प्रेममूर्ती ह.भ.प. भगीरथ महाराज काळे शास्त्री यांच्या हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कीर्तनातून उपस्थितांना आध्यात्मिक विचारांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांसाठी सलग नऊ दिवस ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दररोज रंगणाऱ्या या कार्यक्रमात महिलांना पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच बालकांसाठीही विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने कार्यक्रमाला अधिक रंगत आली.
वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची सांगड घालण्यात आली. या कार्यक्रमाला मुळशी तालुक्यातील विविध पदाधिकारी, नागरिक, ग्रामस्थ आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सर्वांच्या सहभागामुळे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सामाजिक बांधिलकी, धार्मिक परंपरा आणि लोकसहभाग यांचा संगम साधत अमित दादा कंधारे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.





